Sunday 20 January 2019

सासू असावी तर अशी!

मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला माझी बाल मैत्रीण आशा आली होती. मी तिचं चहापाणी केलं, पत्रिका उघडून पहिली, तिच्या सुनेबद्दल सगळी माहिती विचारून घेतली. साड्या खरेदी, दागिने, मुहूर्त आणि बरीच इतर चर्चा झाल्यावर मी अगदी सहजच आशाला विचारले,

"काय गं, सगळी तयारी झालीय पण  बंगल्याला रंग केलास की  नाही? पोराचं लग्न ठरलं की  बंगला रंगवणार असं गेले कित्ती महिने घोकत होतीस ना ?  "

"हो. मागच्याच आठवड्यात झाला बाई रंग. पण आम्ही सगळा बंगला नाही रंगवला."

"म्हणजे काय? का नाही रंगवलास?

आशाचं लग्न झालं तेव्हाची तिच्या सासरच्या घरची परिस्थिती फारच बेताची होती. भाड्याच्या दोन खोल्यात  संसार आणि त्यातच तिचे सासूसासरे, तीन नणंदा आणि दोन दीर. नवऱ्याची खाजगी नोकरी, सासूबाईंची सततची आजारपणे, पाहुणे-रावळे अश्या सगळ्या रगाड्यात आशाला राबताना मी बघितले होते. पण पुढे  मुलगा जरा मोठा झाल्यावर तिने एका खाजगी कंपनीत नोकरी पकडली. तिच्या नवऱ्याने त्याची नोकरी सांभाळत स्वतःचा व्यवसाय चालू केला. बघता-बघता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. आता त्यांचा मोठा बंगला होता. दोन गाड्या, नोकर-चाकर कशा कशाला त्यांना कमी नव्हतं. त्यातून एकुलत्या एका मुलाचं लग्न. मग सगळा बंगला  रंगवायला काय हरकत आहे? असा प्रश्न मला पडणं स्वाभाविकच होतं.

"मी आमच्या बंगल्याचा दर्शनी भाग, स्वयंपाकघर आणि बैठकीची खोली रंगवून घेतलीय"

"अगं पण असं का? तुझी लगबग असेल तर मला सांग. मी उभी राहून रंग करून घेईन. अजून पंधरा दिवस आहेत. निदान पोराची बेडरूम तरी रंगवून घे ना. नव्या सुनेला तिचं नवं घर कसं छान प्रसन्न वाटलं पाहिजे. " 

" पण सून माझ्या घरात राहणारच नाहीये. म्हणजे मीच तिला तसं स्पष्टपणे सांगतलंय."

"हे काय गं? तू असं का सांगितलंस? तिची  तुमच्याजवळ राहायची इच्छा नव्हती का?"

"तिची इच्छा नसायला काय झालंय? तिला आमच्या घरीच राहायचं होतं. पण काय असतं, माहिताय का? कुणालाही काहीही आयतं  मिळालं ना, की त्या गोष्टीची किंमत कळत नाही. मी स्वतः किती कष्ट काढलेत तुला माहितीच आहे. माझ्या सासूचं मला किती करावं लागायचं. त्यातून नणंदांची लग्न, दिरांची शिक्षणं, त्यांची लग्नं,  सगळं आम्हीच तर केलं. ही माझी सून मात्र अगदी राणीसारखी येणार. त्यातून हिची मल्टिनॅशनल कंपनीतली नोकरी. मग तर काही विचारूच नका. ती सकाळी आठ-नऊ वाजता घर सोडणार ते रात्री सात-आठ वाजताच उगवणार. म्हणजे सकाळच्या चहापासून ते हिच्या रात्रीच्या जेवणापर्यंत हिच्या दिमतीला पुन्हा आपली मीच. पुढे पोरं झाली की फुकटचं पाळणाघर आणि सांभाळणारी हक्काची बाई आहेच घरच्या घरी. मला जसे कष्ट पडले तसे तिलाही जरा कष्ट सोसू देत ना. निदान दोघांचं तरी स्वयंपाक-पाणी करू दे. मी हयात असेपर्यंत, माझ्या संसारातले तिला आयते काहीही मिळणार नाही."

आशाचं  ते  बोलणं ऐकून मी अवाक झाले. खरंतर मला तिच्या कडवट बोलण्या-वागण्याचा खूप रागच आला. सुशिक्षित, सुसंस्कृत घरातल्या माझ्या या मैत्रिणीने सून घरात यायच्या आधीच असा काहीतरी विचार करावा हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे होते. पूर्वीच्या सासवांसारख्या खाष्ट सासवा नसल्या तरीही आपल्या सुनेला सुख मिळू नये असा खवचट विचार करणाऱ्या बायका आजही आहेत, हे बघून मला वाईट वाटलं.  

आशाच्या मुलाचे लग्न थाटात झालं. बंगल्याच्या दर्शनी भागाला रंग दिलेला असल्यामुळे आणि केलेल्या रोषणाईमुळे तिचा बंगला उजळला होता. पण माझ्या मनातली आशाची प्रतिमा मात्र पुरती काजळली होती. आशा माझ्या मनांतून साफ उतरूनच गेली.  

चार-पाच महिन्यापूर्वी माझ्या चुलत भावाच्या मुलीचे लग्न ठरल्याचे कळले आणि आम्ही सगळे खूष झालो. मुलाचे कुटुंबीय आमच्या पूर्वपरिचयातलेच होते. मुलाचे आई-वडील आसावरी-प्रदीप अतिशय चांगली, सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसे आहेत, हे माहीत होतेच. पण बरेच वर्षांत त्यांच्याशी माझा काहीच संपर्क नव्हता. आमचा भावी जावई हा आसावरीचा एकुलता एक मुलगा आहे हे ऐकल्यावर मात्र नकळतच मला आशाच्या बोलण्याची आठवण आली.

गेल्या महिन्यात मोठ्या थाटात भाचीचे लग्न पार पडले. आपल्या नात्यातल्या कुणाही मुलीचे लग्न लागताना बायकांचे डोळे भरून येतात. काहीजणींच्या डोळ्यातून तर सहजच घळाघळा पाणी वाहायला लागते. माझ्या ओळखीतल्या काही बायका तर अगदी कुठल्याही आणि कोणाच्याही लग्नांत रडू लागतात. पूर्वीच्या काळात लहानग्या मुली परक्या घरी जायच्या. पुढे सणावारांखेरीज भेटी-गाठी क्वचितच व्हायच्या. सासुरवास तर असायचाच. खरं तर आज पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही. तरीही आजदेखील लग्नाच्या आनंददायी मंगलप्रसंगी बायकांना रडू येतं हे मात्र खरं.  

लग्नानंतर दोन दिवसांनी माझ्या भावाने माझ्या भाचीच्या गृहप्रवेशाच्या वेळचा एक छोटासा व्हिडीओ पाठवला. गृहप्रवेशाच्यावेळी तिच्या सासूने, म्हणजे आसावरीने एक अतिशय भावपूर्ण कविता म्हटलेली दिसली. पद्मा गोळे यांची 'चन्द्रकोर' असे शीर्षक असलेली ती कविता आहे. सून घरात येत असताना सासूच्या मनातली चलबिचल आणि येणाऱ्या सुनेचे, सासूने मनापासून केलेले स्वागत या कवितेत शब्दबद्ध केलेले आहे. आसावरीच्या सुरांमधून, चेहऱ्यावरच्या भावांमधून आणि संपूर्ण देहबोलीतून सुनेच्या आगमनाप्रति असलेल्या तिच्या सच्च्या  भावना, तिची आतुरता, उत्सुकता आणि निर्व्याज प्रेम छान प्रतीत होताना दिसले. 

एका सासूच्या भूमिकेतले आसावरीचे हे रूप बघून माझ्या मनातली तिची प्रतिमा पुन्हा एकदा लख्ख उजळून निघाली. "सासू असावी तर अशी" असेच मला वाटले. खरंतर प्रत्येक सासूने आपल्या सुनेचे स्वागत याच भावनेने करायला हवे. तो व्हिडीओ पाहताना मात्र माझे डोळे पाणावले. अर्थातच ते आंनंदाश्रू होते.

आसावरीने गायलेली ती कविता आणि ती म्हणतानाचा तिचा व्हिडीओ मी मुद्दाम तुमच्यासाठी पाठवतेय.  

चन्द्रकोर
मेंदी-रेखली पाउलें
उगा येती डोळ्यांपुढे
किणकिणती कानांत
नाजुकसे हिरवे चुडे.


सारखीच लगबग
जोडव्यांव्या तालावर,
इथे तिथे झगमगे
सोनसळीची किनार.


उगीचच पानोपानीं
जाई दारची लाजते,
दाराआडून कुणाचें
मुख लाजरें साजतें ?


कळी कुठे तें कळेना,
गंधे कोंदाटते मन :
आगमनाचे तिचिया
मोजितें मी क्षणक्षण.


ये ग माझ्या, चंद्रकोरी
उजळाया माझें घर :
माहेराच्या ममतेने
उभें स्वागता सासर !
                                                        

पद्मा (आभाळवेडी)